सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना विकल्प भरून देण्यास मुदतवाढ मिळावी –जळगांव जुक्टो संघटनेची मागणी
कुंभारखेडा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. योगेश कोष्टी l मा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाद्वारे दि.13 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या पत्रानुसार राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या व एन.पी.एस.मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळ (One Time Option) विकल्प येत्या 31 मार्च 2025 अखेर आपापल्या कार्यालय प्रमुखांकडे सुपूर्द करावयाचा आहे.
सदर विकल्प भरून द्यावा अशा आशयाचे पत्र प्राप्त माहितीनुसार आजवर केवळ शालेय शिक्षण व जलसंपदा या दोनच विभागांनी काढलेले आहे असे समजते. वास्तविकता या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत अत्यावश्यक शर्ती व अटी विहित करणे तसेच योजनेचे नियम व कार्यवाही निश्चित करण्यास मा.वित्त विभागाला प्राधिकृत करण्यात आलेले आहे. मात्र आज अखेर देखील वित्त विभागाद्वारा या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेत सहभागी झाल्यास कर्मचाऱ्यांना नेमका कोणता व कसा आर्थिक दिलासा सेवानिवृत्तीपश्चात मिळणार आहे या संदर्भातला कुठलाही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. अशा अवस्थेत 31 मार्च 2025 अखेर सदर विकल्प भरून देण्यास मात्र सुचित करण्यात आलेले आहे.
कर्मचाऱ्यांच्या भवितव्याची कशी आणि कुठली जोखीम शासन घेणार आहे या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. कारण सदर विकल्प एकदा भरून दिल्यास कुठल्याही कर्मचाऱ्याला सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतून पुन्हा एकदा एन.पी.एस.मध्ये परत येण्याचा अधिकार नसणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हितार्थ सदर विकल्प भरून देण्यास मुदतवाढ मिळणे व या संदर्भातील सेवानिवृत्ती पश्चात आर्थिक लाभ कसा असणार आहे या संदर्भातील स्पष्टता येणे अत्यावश्यक असल्यामुळे जोपर्यंत योजनेच्या संदर्भातील सुस्पष्टता शासनाद्वारा जाहीर करण्यात येत नाही तोपर्यंत सदर विकल्प न भरण्यासंदर्भात योग्य ती मुदतवाढ द्यावी व कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा द्यावा. अशी आग्रही विनंती प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष), प्रा.सुनील गरुड (जेष्ठ मार्गदर्शक), डॉ.अतुल इंगळे (उपाध्यक्ष),प्रा.राहुल वराडे (महानगराध्यक्ष),प्रा.स्वप्नील धांडे यांनी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने केलेली आहे.