ब्रेकिंग : अखेर एलसीबी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले निलंबित; महानिरीक्षकांची कारवाई
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरत वक्तव्यचे पडसाद उमटल्यानंतर तडकाफडकी निलंबन करीत असल्याचे आदेश नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी रात्री उशिरा काढले आहे. निलंबनाचे आदेश काढल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
समाजाविषयी आक्षेपार्ह बोलणे बकाले यांना चांगलेच भोवले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका व्यक्तीशी फोनवर बोलत असताना समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या व्यक्तींनी आणि संस्थांनी एकत्र येत पोलीस अधीक्षक कार्यालयावर धाव घेतली होती. बकालेंनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर समाजात तीव्र संताप उमटला. पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन काळ्या फिती लावून त्यांच्याविरोधात घोषणबाजी करण्यात आली.
याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बकालेंविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव पाठविला होता. त्याशिवाय यात खातेअंर्तगतही चौकशी सुरु झालेली आहे. गणेशोत्सव काळातील ही क्लीप असल्याचे सांगितले जात आहे. यात पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत राजकारणही चव्हाट्यावर आलेले आहे.
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक लाईव्ह करत तातडीने निलंबित करण्याची मागणी केली तसेच बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली होती तर मागणी मान्य न झाल्यास समाजाचा महामोर्चा काढण्याचा ईशारा दिला होता. यानंतर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.