जळगाव आशादिप वसतिगृह अत्याचार प्रकरणी गृहमंत्र्यांनी लावली चौकशी !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। पिडीता, निराधार, स्त्रीअत्याचाराच्या प्रकरणातील आसरा नसणाऱ्या महिला- मुलींसाठी शहरात आशादिप शासकिय वसतीगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली गैरव्यवहार होत असल्याचे तक्रारींचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. शिवाय रात्री या प्रकरणाचे व्हिडीओ व्हॉटस्ॲपवर व्हायरल झाले होते. सदर प्रकरणाचा मुद्दा आजच्या विधीमंडळाच्या कामकाजात चांगलाच गाजला.
मुलींनी दिलेल्या माहिती नुसार १ मार्च २०२१ रोजी वस्तीगृहामध्ये काही पोलीस कर्मचारी व अनोळखी पुरूषाने अनाधिकारे प्रवेश करून मुलीसोबत अश्लिल चाळे केले. इतकेच नाही तर नृत्य करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरेाप या मुलीने केला आहे. मुलींच्या तक्रारी ऐकण्यासाठी महिला कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांच्यासह महिला गेल्यावर त्यांना मुलींशी भेटू देण्यात आले नाही. मात्र वरच्या मजल्याच्या खिडकीतून मुलींनी आरडाओरड करून सांगितले की, आम्हाला बोलू द्या..खिडकीतून तक्रारी करुन सत्यपरीस्थीती मांडणाऱ्या मुलींचे व्हिडीओ रात्री सोशलमिडीयातून व्हायरल झाले होते.
विधीमंडळात पडसाद, गृहमंत्र्यांनी लावली चौकशी
जळगावातील आशादीप वसतीगृहातील मुलींसोबत घडलेल्या अत्याचाराचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. या प्रकरणी चार सदस्यांची समिती नेमून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसात चौकशीचे निर्देश दिले आहेत. आशादीप वसतीगृहात तरूणींना पोलीस नग्न करून नाचवत असल्याचा भयंकर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून विधीमंडळात खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि अन्य अन्य सदस्यांनी या प्रकरणी सरकारचा निषेध करून चौकशीची मागणी केली. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चार सदस्यीय समिती नेमून दोन दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देत दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.