जळगाव खुनाने हादरले ! डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून महिलेची हत्या
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | शहरातून गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आलीय. गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने जळगाव शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागील बाजूला असलेल्या रणछोड नगर परिसरात राहणारे राजेश नवाल यांचे दाणाबाजारात धान्याचे दुकान आहे. गुरुवारी ते दुकानावर गेलेले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावाची पत्नी देखील मंदिरात गेलेली होती. राजेश नवाल यांच्या पत्नी सुवर्णा राजेश नवाल (वय-५७) या घरी एकट्याच होत्या.
रात्री ८:४५ वाजेच्या सुमारास राजेश नवाल हे घरी आले असता घरात पत्नी सुवर्णा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनांसाठी धाव घेतली आणि पुढच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह पोलीस पथक पोहचले आहे.