नशिराबाद गोळीबार ; दोघा संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। नशिराबाद येथे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार आणि चॉपर हल्ला झाला होता. यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील अटकेतील दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने आज पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील पंचशील नगरात ११ ऑक्टोबर २०२० रोजी मदिना मशिदीजवळील रहिवासी मोहम्मद कैफ शेख जाकीर (वय २७) हा आपल्या आई-वडील आणि भावसह रात्री जेवण करून घरासमोर बसला होता. या वेळी पाच जणांनी मोहम्मद कैफ यास शिवीगाळ करीत चपटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मोहम्मद कैफ याच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात गंभीर दुखापत होऊन मोहम्मद याचा मृत्यू झाला होता. तर मोहंमदच्या अंत्यसंस्काराप्रसंगी त्याचा भाऊ समीर याने आपण हत्येचा बदला घेणार असल्याची जाहीर प्रतिज्ञा केली होती.
या गुन्ह्यात धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय-२० रा. पंचशील नगर भुसावळ) हा गेल्या ११ महिन्यांपासून कारागृहात होता. मंगळवार २१ सप्टेंबर रोजी त्याची जामीनावर भुसावळ न्यायालयाने सुटका करण्यात आली होती. त्याचे वडील मनोहर सुरडकर हे भुसावळ न्यायालयातून जामीनाची आर्डर घेवून जळगाव कारागृहात आले होते. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगावातून भुसावळ जाण्यासाठी मुलगा धम्म याला घेवून नशिराबाद मार्गे निघाले. दरम्यान, आगोदरच पहारा ठेवून असलेले समीर आणि रेहानुद्दीन यांनी पितापुत्राला नशिराबाद पुलाखाली अडविले. समीरने धम्मवर गोळीबार करून जागीच ठार केले तर रेहानुद्दीन याने मनोहर सुरळकर यांच्यावर चॉपर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. धम्म हा जागीच ठार झाल्याचे पाहून दोघे संशयित आरोपी घटनास्थाळून पसार झाले.
घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी दोघांवर मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज बुधवार २२ सप्टेंबर रोजी नशिराबाद पोलीसांनी संशयित आरोपी शेख समीर उर्फ भांजा शेख जाकीर (वय-२१) आणि रेहानुद्दीन नईमोद्दीन (वय २१) दोन्ही रा. पंचशिल नगर यांना अटक केली. न्यायालयाने दोघांना २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.