राष्ट्रवादीचे तीन उमेदवार बिनविरोध होणार : भाजपला धक्का !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झालं असून याबाबत अधिकृत घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वीच अर्ज दाखलच न झाल्याने शिवसेनेचे २ तर राष्ट्रवादीचे १ असे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. दरम्यान काल बुधवार रोजी छाननीत अर्ज अवैध ठरल्याने राष्ट्रवादीचे आणखी तीन उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. छाननी दरम्यान अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. यात काही उमेदवारांचे अर्ज बाद ठरले असून यात अमळनेर मधून भजपाच्या माजी आ. स्मिता वाघ यांचा अर्ज बाद करण्यात आला तसेच मुक्ताईनगर आणि बोदवड येथील उमेदवारांचे अर्ज देखील बाद झाले.
यामुळे सोसायटी मतदारसंघातून अमळनेर येथून राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील तर बोदवड मधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांची बिनविरोध निवड निश्चीत झाली आहे. मुक्ताईनगर मधून फक्त माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज आहेत. यात रोहिणी खडसे अर्ज मागे घेऊन त्या महिला वर्गवारीतून निवडणूक लढविणार असल्याचं समजतं यामुळे एकनाथ खडसेंचा विजय निश्चीत मानला जात आहे.