किराणा दुकान फोडून सोन्याचा दागिन्यांसह २ लाख ५० हजारांचा ऐवज चोरीला !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरातील रामेश्वर कॉलनीत आज सकाळी तुळजामाता नगरातील घरातच असलेले किराणा दुकान फोडून दुकानातील एका बरणीत ठेवलेल्या सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा २ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे, रामेश्वर कॉलोनीतील तुळजामाता नगरात राहणारे सुरेश तानाजी पाटील त्याच्या घरातच सुनंदा किराणा स्टोअर्स नावाने दुकाने चालवतात. नेहमीप्रमाणे ४ सप्टेंबर रोज शनिवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास सुरेश पाटील यांनी दुकानातील दागिणे व रोकड व्यवस्थित असल्याची खात्री करुन दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी रविवारी मुलगा व पत्नी दोन्ही जण पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले तेव्हा दुकानाचे शटर अर्धवट वाकवून कुलूप तुटलेले दिसल्याने दुकानात पाहणी केली असता, दुकानातील सामान अस्ताव्यस्त होता व दागिणे व रोकड ठेवलेली बरणी तसेच डबा कुठे दिसला नाही बरणीतील दागिणे व डब्यातील ६० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमालांची चोरी झाल्याचे लक्षात आल्याने घटनेची माहिती सुरेश पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. याप्रकरणी सुरेश पाटील यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.