अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी २० वर्ष सश्रम कारावास, जळगाव न्यायालयाचा निकाल
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव येथील अतिरीक्त सत्र न्यायालयाने शनिवारी सामूहिक अत्याचार प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ४५ हजार रुपये दंड ठोठावला.
शहरातील एका अल्पवयीन मुलीवर दि.२४ नोव्हेंबर २०१९ रोजी आरोपी गणेश कमलाकर सुर्वे ,वय २० व प्रकाश सुरेश नागपुरे,वय २२, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव. यांनी पीडितेला गोशाळेत फिरायला रिक्षात घेऊन गेले होते. तेथून त्यांनी पीडितेला एका शेतात नेऊन दोघांनी अत्याचार केला. या संदर्भात पिडीतेने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी गणेश सुर्वे व प्रकाश नागपुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी विशेष पोस्को न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयासमोर खटला सुरू होता. या खटल्यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित व डॉक्टर यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व विशेष सहकारी ऍड. चारुलता बोरसे यांनी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून युक्तिवाद केला.
आरोपीतर्फे विधिज्ञ सागर चित्रे व ऍड.मंजुळा मुंदळा यांनी काम पाहिले.न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तीवाद यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी दोघांना २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ४५ हजार रुपये दंड ठोठोवला. याकामी पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.