अवैध गुटखा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा, गुन्हा दाखल
जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। गुटखा व पान मसाला विक्री करणाऱ्या नशिराबाद येथील सुरत पानवाला शॉप दुकानावर अन्न व सुरक्षा औषध प्रशासनाने कारवाई करून ६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद येथील बसस्थानक परिसरात असलेल्या सुरत पानवाला शॉप दुकानावर अवैधरित्या गुटखा व पान मसाल्याची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शरद मधुकर पवार यांच्यासह त्यांच्या पथकाने दुकानावर छापा टाकला.त्यात ६ हजार ६०० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा आढळून आल्याने हा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुकानदार सय्यद खलील सय्यद अमीर ,वय ४०. रा. नशिराबाद, ता. जळगाव याच्या विरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.