जळगाव महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव महानगरपालिकेची मुदत संपली असून आता सार्वत्रिक निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी दि. १५ सप्टेंबर रोजी एका आदेशाद्वारे महानगरपालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड याची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूका विहीत वेळेत घेणे शक्य होणार नसल्याचे तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार पालिकेची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची असल्यामुळे सदर मुदत पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार दि.१७ सप्टेंबर रोजी मुदत संपत असलेल्या जळगांव महानगरपालिका येथे प्रशासक पदावर आयुक्त, जळगांव महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आयुक्त, जळगांव महानगरपालिका यांनी महानगरपालिकेची विहीत मुदत संपल्यापासून प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारावा तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी- छापवाले यांनी हे आदेश पारित केले आहे.