पाच हजाराची लाच भोवली, ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी मिळाली असताना ही परवानगी दिल्याचा मोबदला म्हणून ग्रामसेवकाने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाच मागितली होती,चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव ग्रामपंचायतीचे हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे या ग्रामसेवकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली. या घटनेमुळे चोपडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ३३ वर्षीय व्यक्तीने पारगाव येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीचे परवानगी मिळावी म्हणून तक्रारदारांनी दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. येथील ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे, वय ३९, यांनी वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली. केलेल्या कामाचा मोबदला व बक्षीस म्हणून तक्रारदारांकडे ७ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.तक्रारीनुसार एसीबीने सापळा रचत बुधवार दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे, वय ३९, यांनी तडजोडी अंती तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यांना अटक करून त्यांच्यावर अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एन एन जाधव, फौजदार सुरेश पाटील, सहायक फौजदार दिनेश सिंग पाटील, पोना बाळू मराठे, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, रवींद्र घुगे,शिपाई राकेश दुसाने,अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली आहे.