नशिराबाद मध्ये मोठी कारवाई, गोडाऊनवर छापा टाकून ५८ लाखाचा गुटखा जप्त
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अन्न व औषध प्रशासनाने नशिराबाद परिसरात गोडाऊन वर छापा टाकून राज्यात बंदी असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखूचा साठा पकडला आहे. एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न् व औषध प्रशासनाचे गुप्तवार्ता विभागास नशिराबाद परिसरात राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा चोरट्या पध्दतीने वाहतूक व विक्री करण्याचा व्यवसाय एका गोडवूनमधून चालत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त् झाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून नशिराबाद येथील जय मुंजोबा पेपर बोर्ड कारखान्याचे मागील बाजूस असलेल्या गोडावून वर छापा घातला. टाटा अल्ट्रा बनावटीचे एका वाहनातून गोडाऊन मध्ये राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा उतरवत असताना मिळून आला. प्रशासनाचे अधिकारी यांनी कारवाई करत सुमारे ४८ लाख २७ हजार ९०० रुपये इतक्या किमतीचा प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा, वाहन किंमत सुमारे १० लाख रुपये मात्र असा एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.
साठा आढळून आलेले गोडाऊन पुढील तपास कामी सिल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित मिथुन कुमार साहनी (रा. बिहार), अजयकुमार कापोरी साहनी (वय १८,रा. बिहार) याना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. यावेळी वाहन चालक अब्दुल झहीर खान (रा. खरजना, इंदोर), वाहन मालक बलविर सिंह बग्गा (रा. इंदोर), क्रेटा वाहनातून फरार झालेला मामा (पूर्ण नाव उपलब्ध नाही) नामक मॅनेजर तसेच जागा मालक व साठामालक यांचे विरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला असून मुख्य साठा मालक, पुरवठादार यांचा शोध घेणे तसेच गुन्ह्यात सहभागी छुपे भागीदार याचेबाबत पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. सदर कार्यवाही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी गुप्तवार्ता विभाग अन्न सुरक्षा अधिकारी जळगावचे शरद पवार यांच्या संपूर्ण पथकाने केली. शरद पवार यांनी फिर्याद दिली आहे.