ब्रेकिंग ! वेगळ्या खान्देशची आ.एकनाथराव खडसे यांची मागणी, का केली मागणी?
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। “जळगाव जिल्हा, आमचा खान्देश, उत्तर महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे प्रकल्प अशा स्वरुपात हलवले जात असतील, आमच्या खान्देशावर अशाप्रकारे अन्याय होत असेल तर मला महाराष्ट्रातून खान्देश हा वेगळा केला पाहिजे”, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केला.
‘महाराष्ट्रातून खान्देश वेगळा करा’, जळगाव जिल्हा आणि खान्देशातील मंजूर झालेले अनेक विकास प्रकल्प दुसरीकडे हलवण्यात आल्याने एकनाथ खडसे हे संतापले आहेत. त्यांनी खान्देशासाठी मंजूर झालेले पण नंतर इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतरीत झालेल्या प्रकल्पांची यादीच सांगितली. त्यामुळे खान्देशावर अन्याय होत असल्याची भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली. याच उद्विग्नतेतून त्यांनी वेगळ्या खान्देशाची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली आहे.
“जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून अनेक मोठ्या प्रकल्पांना परवानगी मिळाली आहे. काही प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहेत. काही कालखंडात ते मंजुरीपर्यंत पोहोचून गेले आहेत. पण गेल्या 10 वर्षात असं लक्षात आलं की, या प्रकल्पांना वेग तर आला नाहीच, पण इथले प्रकल्प बाहेर जिल्ह्यामध्ये हलवण्याचा प्रयत्न होतोय”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली.
‘ अन्याय केल्यासारखं आहे खान्देशवर’
“महत्त्वाचा भाग म्हणजे अलिकडच्या कालखंडात, परवा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की, पशुवैद्यकीय महाविद्यालय जे जळगावसाठी मंजूर होतं, त्यासाठी सालबर्डी 60 एकर जागा त्यांच्या नावावर करुन देण्यात आली होती. नंतर उर्वरित जागा नवीन मेडिकल कॉलेजच्या बाजूला घेण्याचं काम सुरु होतं. त्या जागेची पाहणी करुन ती सुद्धा अंतिम झाली होती. अशा स्वरुपामध्ये तो प्रकल्प अकोल्याला हलवणं म्हणजे खान्देशावर अन्याय केल्यासारखं आहे. उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केल्यासारखं आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव प्रलंबित’‘तापी सिंचन विकास महामंडळाचे कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित’
“खान्देशासाठी महात्मा जोतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाचं विभाजन करुन खान्देशला कृषी विद्यापीठ द्यावं, असा निर्णय तत्वत: सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. त्यासाठी कमिटी नियुक्त करण्यात आली होती. त्या कमिटीने सुद्धा अंतिम अहवाल हा सकारात्मक दिलेला आहे. पण गेल्या सहा-सात वर्षांपासून तोही प्रस्ताव प्रलंबित आहे”, असा दावा खडसेंनी केलाय. तसेच “तापी सिंचन विकास महामंडळाचे कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. या ठिकाणी गिरीश महाजन मंत्री असताना त्यांनी टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली. टोक्स्टाईल पार्कही या ठिकाणी नाही. लिंबू वर्गीय संशोधन केंद्राला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी जागा दिलेली आहे. हातनूरजवळ मत्सबीचं संशोधन केंद्राला मान्यता दिली आहे, केळीच्या टिशूसाठी उतीसंवर्धन केंद्रासाठी 54 एकर जागा रावेर तालुक्यात त्यांच्या नावावर करुन देण्यात आली आहे”, असं खडसे म्हणाले.
गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर खडसेंचा निशाणा
“जिल्ह्यामध्ये असे अनेक प्रकल्प पेंडिंग आहेत. इथले पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन गेल्या आठ-दहा वर्षांपासून मंत्रीपदावर आहेत. गिरीश महाजन तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहे, असं समजलं जातं. गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, असं समजलं जातं. पण जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांना वेग आलेला नाही. यापूर्वी शासकीय इंजिनियरिंग कॉलेजला मान्यता आलेली होती. ते आम्ही सुरु केलेलं आहे”, असं एकनाथ खडेस यांनी सांगितलं.
‘आम्ही 100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता दिली’
“अल्पसंख्यांक समाजासाठी जे शासकीय इंजिनियरिंग कॉलेजसाठी 100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली होती. त्यातील प्रकल्पाचे 60 कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहेत. माझ्या कालखंडातले अनेक प्रकल्पांना वेग आलेला आहे. सारंगखेडं, सुलवाडा, प्रकाशा वगैरे बॅरेजेस पूर्ण झालेले आहेत. अगदी शेडगावलाही थोडं पाणी थांबलेलं आहे”, असं खडसे म्हणाले.
“उपसा सिंचन योजना गेल्या आठ-दहा दिवसांत न झाल्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही, असं आहे. शेतीला पाणी मिळत नाही म्हणून कोणत्याही नेत्याने बैठक बोलावल्याचं मला तरी आठवत नाही. या जिल्ह्याच्या नागरिकांनी एकत्र उठाव करण्याची आवश्यकता आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
‘तुमची प्रतिष्ठा पणाला लावा आणि…’
“विकास थांबला असेल, रोजगार मिळत नसेल, तर कुणाकडे बघायचं? मंत्री महोदय काय करत आहेत, पालकमंत्री काय करत आहेत? माझी त्यांना विनंती आहे की, तुमची प्रतिष्ठा पणाला लावा आणि आमच्या जिल्ह्याचे प्रकल्प मार्गी लावा. इथलं पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखेडला हलविण्यात आलं आहे”, असं खडसे म्हणाले.
‘आम्हाला संतापही येत नाहीय’
“एक-एक प्रकल्प हलवत आहेत आणि आम्ही शांतपणे पाहतोय. आम्हाला संतापही येत नाहीय, आम्हाला ते आहे असं वाटतही नाही. मी विधानसभेत अनेकदा प्रश्न विचारले. पण सरकारकडे दुर्लक्ष केले. सर्वांनी यासाठी एकत्र यावे अशी माझी जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे”, असं आवाहन खडसेंनी केलं.