ब्रेकिंग : जळगाव खुनानं हादरलं, चॉपरने वार करून तरुणाचा निर्घृण खून
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज दुपारी जळगाव शहरातील समता नगर मध्ये जुन्या वादातून चॉपरने वार करून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली. घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहे. मयत तरुणाचे नाव अरुण बळीराम सोनवणे, वय-२८, रा. समता नगर जळगाव असे असून त्याचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.
समता नगर परिसरात जुन्या वादातून आज सकाळी काही तरुणांसोबत अरुण याचा वाद झाला होता. त्यामुळे हा वाद काहींच्या मदतीने मिटवण्यात आला होता. परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा हा वाद उफाळून आल्याने काही संशयितांनी मयत अरुण बळीराम सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे एकट्याला बोलवले.अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हा देखील तिथे धावत गेला. तोवर इतर मारेकऱ्यांनी त्याच्यावर चॉपर व कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर सोबत असलेले आशिष संजय सोनवणे आणि गोकुळ बळीराम सोनवणे हे गंभीरित्या जखमी झाले.
घटना घडल्यानंतर तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी अरुण सोनवणे याला मयत घोषित करण्यात आले. यावेळी शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची व मित्रपरिवाराची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर समतानगर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) च्या पथकाने संशयितांची नावे निष्पन्न केली असून संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पथके रवाना केली आहेत.