“आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाल्याच फळ शिवसेनेला मिळालं” ; ठाकरे यांना गिरीश महाजनांचा टोला
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तर यातच उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे अनेक नेते उद्धव ठाकरे गटावर सडकून टीका करत असल्याचं पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी ते बोलत होते.
बोलताना म्हणाले की, “अडीच वर्षांचा आमचा काळ फुकट गेला. आमच्या पाठीत शिवसेनेनंच खंजीर खुपसला. आमच्याशी गद्दारी करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला जाऊन मिळाले. मात्र याचं फळ शिवसेनेला मिळालं आहे. त्यांचे ५० पैकी ४० आमदार गेले, १८ पैकी १२ खासदार गेले”, असं म्हणत महाजन यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
पुढे ते म्हणाले, की ‘आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आता ते नावासाठी, चिन्हासाठी भांडत आहेत. परवा मैदानासाठी भांडत होते, पुढे काही दिवसांनी शिवसेना भवनसाठी मारामाऱ्या होतील’, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यावेळी पुढे बोलताना त्यांनी उघड्यावर शौचास बसू नका, असं आवाहनही लोकांना केलं. हे थांबविण्यासाठी यापुढे मी गांधीगिरी करणार असून रस्त्यावर बसणाऱ्या लोकांना गुलाबपुष्प देणार आहे. स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे, असं आवाहन यावेळी गिरीश महाजन यांनी केलं आहे.