आ. सावकारे कार ट्रान्सफर प्रकरण भोवले : सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलंबित
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याच्या प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली होती आता या प्रकरणात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) गणेश पाटील यांना प्रकरणात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आल्याने परिवहन विभागात पुन्हा प्रचंड खळबळ उडाली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर भुसावळ भाजपचे आमदार संजय सावकारे यांची कार २८ डिसेंबर रोजी परस्पर ट्रान्सफर करण्यात आली होती. याच प्रकरणात वरिष्ठ अधिकार्यांनी देखील निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणात सहायक प्रादेशीक परिवहन अधिकारी गणेश वामन पाटील यांनी अक्षम्य महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १०७९च्या नियम तीनचा भंग केल्याचा ठपका यांच्यावर ठेवण्यात आल्याने त्यानूसार त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) या अंतर्गत शासनाला प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करुन त्यांना तात्काळ निलंबित केले आहे.
कार ट्रान्स्फर प्रक्रियेत ओटीपीसाठी अशोक पाटील या आरटीओ एजंटचा नंबर वापर करण्यात आल्याने त्यांच्यासह प्रशांत भोळे व शेख अकील शेख रेहमान या तिघांवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकेची कारवाई करण्यात केली होती. तर कामात कुचराई केल्या प्रकरणी चार कर्मचार्यांना निलंबीत देखील करण्यात आले होते. निलंबनाच्या कार्यकाळात गणेश पाटील यांचे मुख्यालय औरंगाबाद असणार आहे. कार्यालयाच्या परवानगीशिवाय त्यांना कार्यालय सोडता येणार नाही. या कालावधीत त्यांना खासगी नोकरी, व्यवयास करता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे. राज्यपालांच्या आदेशाने ही कारवाई केली असून अव्वर सचिव म. रा. लांघी यांची स्वाक्षरी आहे.