जिल्हा दूध संघाची वादग्रस्त नोकरभरती अखेर रद्द, नवीन संचालक मंडळाचा निर्णय
जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असताना जळगाव जिल्हा दूध संघाची वादग्रस्त ठरलेली नोकर भरती अखेर नवनिर्वाचित संचालक मंडळाने रद्द केली आहे.जळगाव जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, आजच्या दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. तसेच आ.एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात संघाला तब्ब्ल ९ कोटी ६० लाखांचा तोटा होता. पदभार घेतल्यानंतर एका महिन्यात ९० लाख रूपयांचा नफा मिळविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
आज दिनांक २१ जानेवारी रोजी दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात गेल्या सहा वर्षांत ९ कोटी ६७ लाख रूपयांचा तोटा झाल्याची माहिती ही या वेळी देण्यात आली. ऑगस्ट २०२२ या महिन्यात प्रशासकीय मंडळ होते. या काळात २० लाख रूपये नफा झाला, तर आता मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संचालक मंडळाने पदभार घेतल्यानंतर महिनाभरात ९५ लाख रूपयांचा नफा झाल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
तसेच जिल्हा दूध संघात सन २०२१ मध्ये १०४ कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्यात आली होती. राखीव जागाच्या प्रश्नावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळे न्यायालयाने या नोकर भरतीला ‘स्थगिती’ दिली होती. संघाच्या निवडणूक काळात नोकरभरतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजला होता. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असताना या भरतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी गटाने केला होता. पत्रकार परिषदेला दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख ही उपस्थित होते.