नाथाभाऊला विरोध करणे हेच एकमेव काम विरोधकांकडे उरलयं – खडसेंचे टीकास्त्र
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भाजप सोडल्यापासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सातत्याने भाजपवर टीका करताना दिसतात. त्यातही ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगावमधील भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची संधी कधीच ते सोडत नाहीत.
आज पुन्हा एकदा खडसेंनी भाजप आणि शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष करत त्यांच्यावर टीका केली आहे. राज्यात अद्यापही पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या नाही. त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री लवकर द्यावे,अशी सदबुद्धी मुख्यमंत्री शिंदे यांना गणरायानी द्यावी, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
खडसे म्हणाले, मी जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून सक्रीय असून. या कालावधीत ३०-३५ वर्षे एकमेव एकनाथ खडसे हा विरोधकांसोबत लढणारा आणि समर्थपणे त्यांचा सामना करणारा एकमेव माणूस दिसतो. जळगाव जिल्ह्यात शून्यातून भाजप उभी राहिली आहे. यासाठी लोकांनी मला प्रचंड प्रतिसाद दिला असून यामुळे अनेक आमदार, खासदार निवडून आले असून. हे पक्षाचं यश तसेच नेतृत्वाचेही यश आहे, आता पुन्हा ६ वर्षासाठी आमदार झालो आहे. त्यामुळे ३६ वर्ष जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली असून जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे.
मात्र विरोधकांना वाटत की नाथाभाऊला नाउमेद केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. जिल्ह्यात जिल्हा बँका, जिल्हा दूध संघ आणि अन्य ठिकाणी विरोधकांना अपयश आल्याचा उल्लेख करून त्यांनी भाजपला डिवचलं. आता सारे विरोधक एकवटून नाथाभाऊला विरोध करणे हेच एकमेव काम विरोधकांकडे उरलयं, मात्र जोपर्यंत जनता माझ्या पाठिशी आहे. तोपर्यंत त्यांना यश मिळणार नाही, असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.