जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सात महिला सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी केले अपात्र, काय आहे कारण?
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ जळगाव जिल्ह्यातील ५ विविध ग्रामपंचायतीचे ७ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. या सर्वच ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा हिशेब मुदतीत सादर केला नव्हता, या सर्वच सदस्यांविरोधात संबंधित तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यानी त्यांना अपात्र घोषित केले. अपात्र झालेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्या ह्या महिला आहेत.
कोणत्याही निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्या नंतर सर्वच उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्याकडे निवडणुकीचा खर्च मुदतीच्या आत देणे बंधनकारक असताना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील म्हैसवाडी ग्रामपंचायत महिला सदस्या शबाना तडवी, मीना कमलाकर चौधरी, अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील ग्रामपंचायत महिला सदस्या सरुबाई अशोक पाटील,जामनेर तालक्यातील कापूसवाडी येथील ग्रामपंचायत महिला सदस्या देवकाबाई विजय इंगळे, ज्योती प्रभू बेलदार, चोपडा तालूक्यातील अनवर्दे खुर्द येथील ग्रामपंचायत महिला सदस्या रुख्माबाई सुभाष शिरसाठ तसेच चोपडा तालुक्यातीलच वराड येथील ग्रामपंचायत महिला सदस्या मिसाबाई रेवा बारेला यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्याने कलम १४ (ब) नुसार त्यांच्या विरोधात संबंधित तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, दाखल तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेत या ७ महिला ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले.