गुटखा गोदमावर छापा, १० लाखाचा गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू जप्त
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूचा ९ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा एमआयडीसी पोलिसांनी जळगाव शहरातील गुरूदेव नगरातील गोदामातून जप्त केला. या सोबतच ९ लाख रुपये किमतीची २ वाहने व रोख २३ हजार रुपये असा एकूण १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी भगवान साहेबराव पाटील वय ३०, रा. आव्हाणी, ता. धरणगाव याला अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे.
जळगाव शहरातील गुरुदेव नगरात एका वाहनाच्या शोरुमच्या पाठीमागे असलेल्या गोदामात गुटखा साठवून ठेवण्यासह त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पथकाने गोदामात छापा टाकला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पानमसाला, गुटखा, तंबाखू, जर्दा, सुगंधित तंबाखू असा एकूण नऊ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्यासह दोन वाहने व रोख २३ हजार रुपयेदेखील पोलिसांनी जप्त केले. विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकातील पोहेकॉ रवींद्र पाडवी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.