जळगांव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा l आज सकाळ पासूनच जळगांव जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाले आहे. यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठ मोठ्या गारांसह जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे व गारपीटीने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले होते. आज अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी या वादळी वाऱ्यासह ,व गडगडाटासह गारांच्या पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी तरा तुटल्याने वीज गायब झाली आहे, पावसाने हजेरी लावताच भले मोठे झाड उन्मळून पडले. दरम्यान पारोला तालुक्यातील दगली सबगवांन येथील सुनील आबाजी भील या तरुणाच्या अंगावर विज पडून तो मरण पावला.
सावदा शहर व परिसरासह रावेर – यावल तालुक्यात गडगडाटासह वादळी पावसाने हजेरी लावल्याने झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणीची विजेच्या तारा तुटल्या आहेत तसेच पावसासह मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या.