ठाकरे सरकारच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता ; पेट्रोल, डिझेलच्या किमती अजूनही कमी झालेल्या नाहीत
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्यानंतर त्या पाठोपाठ राज्य सरकारने ही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमध्ये दीड-दोन रुपयांनी कपात केली. रविवारी सायंकाळी ही घोषणा करण्यात आली. परंतू, आज मंगळवार उजाडला तरी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात झालेली आता पर्यंत तरी दिसत नाही. त्या मुळे केंद्र सरकार कडून नागरिकांना दिलासा मिळाला परंतु राज्य सरकार कडून अजून पर्यंत देखील दिलासा मिळालेला नाही.त्या मुळे ठाकरे सरकार च्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता वाटल्या गेल्या की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अबकारी करात दुसऱ्यांदा कपात केली. अखेर केंद्राच्या दुसऱ्या दरकपातीनंतर राज्य सरकारने किंचित का होईना व्हॅट कमी केला. पेट्रोल च्या दरात २ रुपये ८ पैसे तर डिझेलच्या दरात १ रुपया ४४ पैसे कमी केले. पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धितकर कपातीनंतर दि. २१ मे २०२२ पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती व औरंगाबाद महापालिका हद्दीत पेट्रोलवर प्रतिलिटर ३२ रुपये ९० पैशांऐवजी ३० रुपये ८२ पैसे तर डिझेलवर प्रतिलिटर २२ रुपये ७० पैशांऐवजी २१ रुपये २६ पैसे इतका मूल्यवर्धित कर असेल. तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी दि. २१ मे २०२२ पासून पेट्रोल वर प्रतिलिटर सरासरी ३२ रु. ८० पैशांऐवजी ३० रु. ८० पैसे इतका तर डिझेल वर प्रतिलिटर २० रु. ८९ पैशांऐवजी १९ रु. ६३ पैसे इतका मूल्यवर्धित कर असेल.
सर्व ऑइल कंपन्या,पेट्रोल पंपधारकांनी याची नोंद घेऊन त्याप्रमाणे कर आकारणी करावी, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले होते. मात्र, आजही पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात केलेली नाही. यामुळे ठाकरे सरकारचा आदेश कंपन्या पाळत नसल्याचे दिसत आहे. आता हे दर कमी होणार की नाही? यापेक्षा सरकार आणि कंपन्यांमध्ये काही बिनसले आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याने व तात्काळ प्रभावाने कपात करण्यास सांगितले आहे. तरी देखील कंपन्या इंधनाचे दर कमी करण्याचे नाव घेत नाही.आता यावर ठाकरे सरकार काय भूमिका घेत या कडे लक्ष लागून आहे.