महामंडळाच्या जळगाव जिल्हा व्यवस्थापकासह एकास लाच घेताना रंगेहाथ अटक
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भटक्या जाती विमुक्त जमातीच्या नागरिकांना सरकारी योजनेतून कर्ज मिळण्याकरिता लाच मागणाऱ्या वसंतराव नाईक महामंडळाच्या जळगाव जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक व कंत्राटी कर्मचारी आनंद नारायण कडेवाल याना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ हजारांची लाच मागताना रंगेहाथ अटक केली आहे.
सरकारी योजनेअंतर्गत तक्रारदारालान १ लाख रुपये कर्ज मिळणार होते. त्यापैकी ७५ हजार रुपये पहिला हफ्ता मिळाला होता. उर्वरित २५ हजाराचा दुसरा हफ्ता तक्रारदाराला मिळणार होता. मात्र हा हफ्ता पाहिजे असेल तर ५ हजार रुपये द्यावे लागतील असे जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक, वय ५५, कंत्राटी कर्मचारी आनंद नारायण कडेवाल वय ३२ यांनी सांगितले होते.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केल्याने आज मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना अधिकारी भीमराव नाईक व आनंद कडेवाल यांना रंगेहाथ पकडले. त्या दोघांवर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्याकामी पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.