जळगावात आगीचे तांडव; फर्निचर दुकान खाक, लाखो रुपयांचे नुकसान
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : jalgaon शहरातील राष्ट्रीय महामार्ग लगत खोटेनगर बस स्टॉप मागील फर्निचर व वेल्डिंग दुकानांना पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत २ फर्निचर व १ वेल्डिंग दुकान जळून झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल तीन ते चार तासांपर्यंत आगीचे तांडव सुरु होते. तब्बल १२ अग्निशमन बंबांच्या प्रयत्नानंतर सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.
खोटेनगर बसस्टॉपजवळील शिव फर्निचर या दुकानाला पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रुप धारण केले. फर्निचर दुकानांजवळील वेल्डींग दुकान पण आगीच्या लपेट्यात सापडले. पोलीस नियंत्रण कक्षातून महापालिकेच्या अग्निशमन बंबाला आगीची माहिती मिळाल्यावर तातडीने शहरातील गोलाणी मार्केट व महाबळ येथील अग्निशमन कार्यालयातील बंब घटनास्थळी दाखल झाले. आग एवढी भिषण होती की, त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले होते. मिळेल त्या बाजूने वाट काढून अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, ही आग कशामुळे लागली अजून हे स्पष्ट झालं नाही. या आगीत फर्निचर तयार करण्यात आलेल्या वस्तूसह दैनंदिन वापरासाठी लागणारे साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्नीशमन कर्मचाऱ्यांच्या शर्थींच्या प्रयत्नांनी लवकर आग आटोक्यात आणल्यामुळे आजूबाजूच्या घरांना आगीच धोका टळला. अन्यथा मोठी घटना घडली असती. सुदैवाने जीवित हानी टळली.