एलसीबी चे निलंबित पो.नि. बकालेंच्या जामीन अर्जाला पोलिसांचा विरोध
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला जळगाव पोलिसांनी आज कडाडून विरोध केला.
बकाले यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने याबाबत पोलिसांचा खुलासा मागवला होता. त्यानुसार आज (बुधवार) रोजी पोलिसांनी आपले म्हणणे सादर करत बकालेंच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला आहे. यावर आता अंतिम युक्तिवाद २३ तारखेला होणार आहे.
त्यानुसार नमूद गुन्ह्यातील संशयितरित्या ऑडीओ क्लिप प्रसारित करणारा सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात त्याचा आक्षेपार्ह संभाषण असलेला मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रार दिली होती. ही तक्रार खोटी असून गुन्हयातील महत्वाचा भौतिक पुरावा नष्ट करण्यात प्रयत्न केला असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच त्याचा गुन्हयातील सहभाग तपासणे बाकी असून अटक करणे देखील आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यापासून किरणकुमार बकालेंनी देखील आपला मोबाईल दि.१५ सप्टेंबर पासून बंद करून ठेवलेला आहे. बकाले देखील सहाय्यक फौजदार महाजन यांच्याप्रमाणे मोबाईल गहाळ झाल्याचे खोटे सांगून पुरवा नष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास बकाले आपला मोबाईल हजर करणार नाहीत. परीणामी मोबाईल जप्त करता येणार नाही, अशी पोलिसांना खात्री असल्यामुळे बकाले यांच्या अटकेची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
गुन्हयाचा तपास प्राथमिक स्वरुपात आहे. त्यामुळे बकालेंना अटक करणे गरजेचे असून अटक न केल्यास गुन्हयातील महत्त्वाचा पुरावा नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच संशयित आरोपी हा साक्षीदार व इतरांना दबाव आणून तपासात अडथळा निर्माण करत पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच बकाले हे पोलीस खात्यातील असल्यामुळे त्यांना मोबाईल बाबत संपूर्ण माहीती असून गुन्हयातील पुरावे हे तांत्रिक व क्लिष्ठ स्वरुपाचे असल्याने ते नष्ट करू शकतो. एवढेच नव्हे तर अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास त्याच्या ओळखीचा प्रभाव पाडून तपासात अडथळा आणण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान,गुन्हा दाखल होताच किरणकुमार बकाले हे आपली अटक टाळण्यासाठी भुमीगत झाले आहेत. आगदी त्यांचा मोबाईल देखील बंद करुन ठेवला आहे. एवढेच नव्हे तर निलंबन कालावधीत पोलीस उपधिक्षक गृह, नाशिक ग्रामीण यांच्याकडे हजर होत नियमीत हजेरी देण्याबाबत आदेश दिल्यानंतरही बकाले नमुद ठिकाणी हजर झालेले नाहीय. यावरून बकाले आपली अटक टाळत असल्याचा पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांना चौकशी कामी किरणकुमार बकाले यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच बकालेंचा अटकपूर्व जामीन मंजुर झाल्यास जनमानसात असंतोष व प्रक्षोभ निर्माण होऊन पुनश्चः कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती देखील आहे. तसेच सदर गुन्हयातील वादग्रस्त व्हायरल ऑडीओ क्लिप नेमकी कुणी व्हायरल केली? याबाबतची चौकशी करावयाची असल्यामूळे बकाले यांना अटक करायची असल्याचे देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, यावर अंतिम सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, मूळ फिर्यादी विनोद देशमुख यांच्यातर्फे ऍड गोपाळ जळमकर आणि सरकार पक्षातर्फे ऍड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज बघितले.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा