…तरी मला संघटनेच्या पदावरून मुक्त करा… राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटीलांचा राजीनामा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लिहलेल्या पत्रातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह उघड झाला आहे. आपल्याला महानगराध्यक्ष पदावरून कार्यमुक्त करावे, असे मागणीचे पत्र अभिषेक पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे,की, मी या पदावर जळगाव शहर विधानसभा लढविल्यापासून आजतागायत १७ महिन्यापासून कार्यरत आहे. या काळात मला स्थानिक नेत्यांकडून खूप काही शिकायला मिळाले. मी निरपेक्ष निर्भिड पणे पक्ष बांधणीचे काम प्रामाणिकपणे केले. ”मला आता स्वतः; पक्षाचे तळागाळात काम करावयाचे आहे. स्थानिक नेत्यांच्या वारंवार तक्रारीमुळे मी पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हतो. तरी मला वरील संघटनेच्या पदावरून मुक्त करावे. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षात इमाने इतबारे काम करेन,” असे पत्र त्यांनी बुधवार पाठविले आहे.
अभिषेक पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत कुरबुरींनंतर जयंत पाटील यांनी महानगराध्यक्ष पदावरून कार्यकारणी बरखास्त करत दूर केले होते अभिषेक पाटील यांच्याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींवरून त्याचा महानगराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या अभिषेक पाटील यांनी जयंत पाटील यांना पत्र पाठविले आहे.