पोस्टाच्या पाकिटावर आता जळगावची केळी,जागतिक स्तरावर केळीला मानाचा दर्जा
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जगभरात प्रसिध्द असलेल्या केळीला पुन्हा मानाचा दर्जा मिळाला आहे. गांधी रिसर्च फाऊडेशन आणि जळगाव डाक विभागाच्या वतीने जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधत मंगळवारी केळीचे महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकीटाचे जळगावात अनावरण करण्यात आले. आता पोस्टाच्या प्रत्येक पाकिटावर केळी झळकणार आहे.
पोस्टाच्या प्रत्येक पाकिटावर केळी
बहुतेक देशांनी महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे जारी केली आहेत. देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पाहायला मिळते. टपाल तिकिटांच्या जगात गांधीजी हे सर्वात जास्त दिसणारे भारतीय आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतातील सर्वाधिक टपाल तिकिटांवर गांधीजींची छबी बघायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवारी सकाळी १० वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात महात्मा गांधींवर आधारित तब्बल १२० देशांची टपाल तिकिटे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. एक दोन नव्हे तर तब्बल १२० विविध देशांची टपाल तिकीटंबाबत मोठी महत्वपूर्ण माहिती नागरिकांना यावेळी मिळाली. तसेच गांधीजींचे जीवन दर्शन नागरिकांना या प्रदर्शनातून घडले.
संपूर्ण जगात ओळख निर्माण
जळगाव जिल्ह्याची केळीच्या माध्यमातून संपूर्ण जगात ओळख निर्माण झालेली आहे. जगातील केळी उत्पादनात एकट्या जळगाव जिल्ह्याचा ३ टक्के इतका सिंहाचा वाटा आहे. या तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जळगावची ओळख सांगणाऱ्या केळीचे चित्र व माहिती असलेल्या पोस्टाच्या पाकिटाचे प्रकाशन देखील करण्यात आले. जळगाव जिल्ह्याची केळीचे आगार म्हणून जागतिक ओळख आहे.
जळगावकरांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट
जळगावला देशाच्या केळीचे केंद्र म्हणून सर्वदूर परिचय आहे. महाराष्ट्र राज्यातील ९०,००० हेक्टर केळीच्या बागांपैकी सुमारे ६० टक्के भाग जळगावमध्ये मोडतो. जैन टिश्युकल्चर रोपे व उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करून जळगावची केळीची ओळख पोस्टाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचेल याहून उत्तम योग तो कोणता असावा. जळगावकरांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे असे मत यावेळी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.