संपातील सर्वच कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईचे संकेत, नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील सुमारे ४५ हजार कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी संपावर गेल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे.कर्मचारी संपावर गेल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. सोबतच अनेक कामे प्रलंबित आहेत. मार्चमुळे वसुली ठप्प झाली आहे. अधिकारी कार्यरत असून, कर्मचाऱ्यांअभावी अधिकारी कार्य करू शकत नसल्याचे चित्र आहे.
त्या मुळे शासन ‘ऍक्शनमोड’ मध्ये आले असून संपातील सर्वच कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा प्रशासनाने महसूल कर्मचाऱ्यांना बजावल्या आहेत. संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांना नोटीस देण्यास सांगितले आहे. त्यानुसार नोटीस तयार करण्यात आल्या.मात्र कर्मचारी नसल्याने ‘व्हॉट्सॲप’वर नोटीस पाठविण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आता ‘व्हॉट्सॲप’वर नोटीस न पाठविता संबंधित कर्मचाऱ्यांच्या ई-मेलवर, घराच्या पत्त्यावर नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल विभागाच्या अकराशे कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात येतील.असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
त्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे, ही बाब आपल्या निदर्शनास या नोटिशीन्वये आणून देण्यात येत आहे. आपण संपामध्ये सहभागी झाल्याने आपले ‘निलंबन’ अथवा ‘आपल्या सेवेमध्ये खंड’ पडू शकतो, ही बाबही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.
राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ‘सहा अ’ नुसार शासकीय कर्मचाऱ्याने कोणत्याही संप/निदर्शनामध्ये सहभागी होऊ नये, असे स्पष्ट केले आहे.