जळगावात अवैध गुटका विक्रेत्यांवर संक्रांत; गुटका माफियांना अर्थपूर्ण अभय कुणाचे ?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन। MTM Newsnetwork
जळगाव (विशेष प्रतिनिधी)। जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कंवर नगर व तंबापुरा परिसरात सुगंधित पान मसाला, तंबाखूजन्य पान मसाला व गुटका अवैधपणे विक्री करणाऱ्या एकाच मालकाच्या दोन दुकानावर व घरावर अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व त्याच्या पथकाने छापा टाकून दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखुजन्य पदार्थ पानमसाले विक्री करणा-या तिघांवर आज धडक पोलिस कारवाई करण्यात आली. कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे तंबाखुजन्य पानमसाला विक्रेत्यांच्या गोटात खळबळ माजली आहे. या कारवाईत लाखो रुपयांच्या मुद्देमालासह विक्रेत्या पती पत्नीस अटक करण्यात आली आहे. या पकरणी अटकेतील दाम्पत्याचा मुलगा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
यातील पहिल्या कारवाईत कंवर नगर येथील रमेश जेठानंद चेतवाणी याच्या घरातून 2 लाख 4 हजार 436 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत रमेश चेतवाणी यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. दुस-या कारवाईत खुबचंद साहित्या कॉम्प्लेक्स, सिंधी कॉलनी येथील खुशी ट्रेडर्स येथून 38 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल विक्रेती महिला शारदा रमेश चेतवाणी हिच्यासह ताब्यात घेण्यात आला. तिस-या कारवाईत 55 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र या मुद्देमालाचा विक्रेता दिपक रमेश चेतवाणी हा मुद्देमाल सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.ही तिन्ही दुकाने एकाच मालकाचे असून रमेश जेठानंद चेतवाणी व शारदा रमेश चेतावणी याना अटक करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त यांच्या अधिसुचनेनुसार अन्न सुरक्षा मानक कायद्यानुसार सदर कारवाई करण्यात आली असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असून एवढा गुटखा येतो कुठून….. याबाबत मोठे प्रश्नचिन्ह असून पोलीस चौकीच्या शेजारी मोठ्याप्रमाणात गुटखा सापडत असेल तर गुटखा विक्रीला पोलीसांचे अर्थ पुर्ण अभय तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत असून सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी केलेली कारवाई अंतिम तपासापर्यंत जावून जिल्ह्यातील गुटखा माफियांना आळा बसविण्यात कारणीभूत ठरेल काय ?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्हयात इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटका विक्री होत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहे.