“सामनातील टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, इथं ठेवू का तिकडे ठेवू!”, गुलाबराव पाटलांचा पलटवार
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मंत्रिमंडळातील खातेवाटपानंतर सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, असं जोरदार टोला राज्याचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) लगावत सामनातून शिंदे गटावर डागण्यात आलेल्या टीकेला पलटवार केलाय.
भाजप तुपाशी, शिंदे गट उपाशी. भाजपने डाव साधलाय. महत्वाची खाती आपल्याकडे ठेवलीत आणि शिंदेगटाला कमी महत्वाची खाती दिली”, असं टिकास्त्र सामनातून शिंदे गटावर डागण्यात आलं. त्यावर गुलाबराव पाटलांनी पलटवार केलाय. “खातं कुणाला कोणतं आलं, त्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी सरकारची असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकतं. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे”, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
खातेवाटपात जे खाते मिळालं आहे त्यावर समाधानी आहात का? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. मला आधी जे खातं होत तेचं पाणीपुरवठा खातं मिळालं आहे. माझे पूर्वीचेच खाते मला मिळाले, त्यामुळे आनंद झाला. माझी सेकंड इनिंग सुरू होत असल्याने जलजीवन मिशन अंतर्गत ३४ हजार गावांना पाणी पाजण्याचा एक मोठा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. आणि गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम करण्यात येणार असल्याने या गोष्टीचा आनंद आहे. मिळालेल्या खात्याने निश्चितच समाधानी आहे, गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा… जिसमे मिला है उस जैसा…अशा गाण्याच्या ओळी म्हणून त्यांनी जे खातं मिळालं त्याचा आनंदही व्यक्त केला.