जिल्हा पुन्हा हादरला! भडगाव तालुक्यातील घटनेनंतर जिल्ह्यात पुन्हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भडगाव तालुक्यातील अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असताना आता पारोळा तालुक्यातूनही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिलेली नाही, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात नुकतंच एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर आता पुन्हा अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही, अशी परिस्थिती आहे.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीडित मुलगी नैसर्गिक विधीसाठी नदीकाठी गेले असताना आरोपीने तिच्यासोबत गैरकृत्य केलं. तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पीडीत अल्पवयीन मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करत आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी केली. पोलिसांकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गुन्हा दाखल
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील एका गावात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केला. आरोपी मुलीच्या डोक्यावर दगड मारून आणि दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्या विरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला तात्काळ अटक करून फाशी द्यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे.