गोळीबारात जखमी झालेल्या माजी नगरसेवकाचा अखेर मृत्यू
जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। गेल्या तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात येऊन आठ गोळ्या मारण्यात आल्या त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयातच मृत्यू झाला आहे.
नाशिक येथील अशोक रुग्णालयातुन मिळालेल्या माहितीनुसार, आज (ता. १० फेब्रुवारी) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास महेंद्र मोरे यांची प्राणज्योत मालवली. ७ तारखेला मोरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण ते उपचारांना साथ देत नव्हते. म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. या ठिकाणी डॉक्टरांकडून त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने आणि तब्बल सात गोळ्या मोरे यांना लागल्याने त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला.
बुधवारी, ७ फेब्रुवारीला चाळीसगाव शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हे रेल्वे स्थानकाजवळील हनुमानवाडीतील कार्यालयात उपस्थित होते. हनुमानवाडी याठिकाणी संध्याकाळी पाचच्या सुमारास कारमधून आलेल्या पाच जणांनी त्याच्या कार्यालयाजवळ गाडी थांबवली आणि आत प्रवेश करत समोर बसलेल्या बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर ८ गोळ्या झाडल्यानंतर ते गाडीत बसून फरार झाले. याप्रकरणी आता 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अद्यापही एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे,३१ वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी नगर, बसस्टॅन्डच्या पाठीमागे, चाळीसगाव. यांच्या फिर्यादीवरून उददेश उर्फ गुडडू शिंदे, रा. हिरापुर, सचिन गायकवाड, रा. चाळीसगाव, अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख, रा. हुडको कॉलनी, चाळीसगाव. सॅम चव्हाण,रा. हिरापुर. भुपेश सोनवणे, रा. चाळीसगाव, सुमित भोसले रा. चाळीसगाव, संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान,रा. हिरापुर. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील पहिल्या पाच संशयितांनी गोळीबार केला, तर सुमित भोसले आणि संतोष निकुंभ हे देखील या कटात सहभागी होते, असे अजय बैसाणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणात एक सीसीटीव्ही फूटेज समोर आला होता. यात काही हल्लेखोर तोंड झाकून येत असताना दिसत आहेत. हल्ला कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यामागे काही राजकीय कारण आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.