राज्य तापले ! पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेची लाट,जळगाव जिल्हा 44 पार
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा उकाडा प्रचंड वाढला आहे. राज्यातील तापमानाची विक्रमी वाढ होत असताना हवामान खात्याने उष्णतेची लाट येण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार राज्यातील काही ठिकाणी पुन्हा 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव,भुसावल सह मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूरमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील कमाल तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त जळगाव मध्ये 44.9C तापमानाची नोंद झाली आहे. परिणामी हिंगोली जिल्ह्यात उष्माघाताने 5 वर्षीय चिमुकलीचा जीव गेल्याची घटना ताजीच असताना राज्यात उष्माघाताने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
अवकाळीसोबतच वाढत्या उन्हाच्या तडाख्यातही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, त्यासाठी छत्री किंवा स्कार्फ वापरा ज्यामुळे त्रास कमी होऊ शकतो असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील 36 पैकी 26 जिल्ह्यांत गेल्या दोन-तीन दिवसांत सरासरी 40 अंश सेल्सिअस तापमानासह उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, अहमदनगर (40.0C), सातारा (40.4C), बुलढाणा (40.6C), पुणे (40.8C), वाशिम, बीड आणि लातूर (41.0C), उस्मानाबाद (41.0C), सोलापूर आणि औरंगाबाद (41.4C), चंद्रपूर (41.6C), जालना, हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली आणि नागपूर (प्रत्येकी 42.0C), अमरावती (42.6C), नांदेड (42.8C), परभणी, गोंदिया , भंडारा आणि धुळे (43.0C), वर्धा (43.4C), परभणी (43.6C), अकोला (44.5C), जळगाव (44.9C) तापमानाची नोंद झाली आहे. तर सिंधुदुर्ग (33.0C), मुंबई शहर (34.4C), रत्नागिरी (35.0C), मुंबई उपनगर (35.2C), कोल्हापूर (35.6C), ठाणे (36.0C), पालघर (36.7C), रायगड (37.0C), नंदुरबार (38.0C), सांगली (38.1C), नाशिक (39.7C) मध्ये तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
उष्णतेच्या लाटेचा इशारा
आयएमडीने संपूर्ण किनारी कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रासह विविध भागांमध्ये उष्णतेची लाट जाहीर केली आहे. किनारपट्टीवरील कोकणासाठी या मोसमातील उष्णतेच्या चौथ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.