जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या उद्या होणाऱ्या आरक्षण सोडती कडे जिल्ह्याचे लक्ष्य
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। जिल्हा परिषदच्या ७७ गट व १५४ गणांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम उद्या म्हणजेच २८ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे आपल्या गट व गण कोणते आरक्षणात निघते, याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अनेकांचे राजकीय भवितव्य उद्याच्या आरक्षण सोडत निघाल्यावरच ठरणार असून या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
जळगाव जिल्हा परिषदच्या ७७ गटांसाठी गुरुवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत निघणार आहे. तर पंचायत समितीच्या १५४ गणांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर गणसंख्येनुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सोडत काढण्यात येणार आहे.
ओबीसीसह आरक्षण सोडत निघणार
जिल्ह्यातील लोकसंख्या, गटातील ओबीसीची संख्या या नुसार ओबीसीच्या १७ जागांवर आरक्षण निघण्याची शक्यता आहे. यंदा दहा गट वाढले असले तरी, सन २०१७ मध्ये एकूण जागा ६७ होत्या. त्यात सर्वसाधारण एकूण ३२ (स्त्री राखीव १६ व सर्वसाधारण १६), नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण जागा १८ ( स्त्री राखीव ९, पुरूष ९), अनुसुचित जमाती एकूण जागा ११ ( स्त्री राखीव ६, पुरूष ५), अनुसुचित जाती एकूण जागा ६ ( स्त्री राखीव ४, पुरुष २). ओबीसीसह आरक्षण होणार असल्याने गेल्या पंचवार्षीक प्रमाणेच स्थिती असणार आहे.
असा आहे आरक्षण सोडतीचा जिल्हाभरातील कार्यक्रम
जळगाव तालुका गण : पंचायत समिती सभागृह, एरंडोल : डीडीएसपी कॉलेज म्हसावद रोड, धरणगाव : प्रशासकीय तहसील कार्यालय, जामनेर : पंचायत समिती सभागृह, भुसावळ : पंचायत समिती सभागृह, बोदवड : तहसील कार्यालय, रावेर : तहसील कार्यालय, यावल : तहसील कार्यालय, पाचोरा : अल्पबचत सभागृह भडगाव रो़ड, चाळीसगाव : सिद्धीविनायक हॉल, करगाव रोड, भडगाव : पंचायत समिती सभागृह, अमळनेर : इंदिरा भवन स्टेट बँकेमागे , पारोळा : नवीन प्रशासकीय इमारत, कासोदारोड, चोपडा : पंचायत समिती सभागृह, जळगाव : सर्व ७७ जि. प. गट नियोजन भवन.