…तर अवैध वाळू माफियांची मालमत्ताच जप्त करणार, जप्तीची पहिली कारवाई रावेर मध्ये – जिल्हाधिकारी अमन मित्तल
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. अवैध वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाची मालमत्ताच जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रावेर येथील मोहन बोरसे नामक वाहन मालकाला अशाच आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याने दंड न भरल्याने त्याच्या मालमत्तांवर बोजे बसविण्याची कार्यवाही केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रावेर येथील कारवाई यशस्वी झाल्यास जिल्हाभरात याच निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.
काही दिवसांपासून वाळूच्या अवैध वाहतूकप्रकरणी महसूलच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईत वाहन जप्त केले जाते. मात्र, या वाहनांना आकारण्यात येणार दंड भरला जात नाही. त्यामुळे अशी वाहने जप्तीच्या ठिकाणी पडून राहतात; पण दंड वसूल होत नाही. आता त्यावरही प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वाळूचे वाहन जप्त केल्यानंतर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाला मालमत्ता जप्तीची नोटीस दिली जाईल. या नोटिस नंतरही त्याने दंड भरला नाही तर त्याच्या मालमत्तेवर बोजे बसवून ती शासनजमा केली जाईल, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.