जळगाव जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या गृह विभागाने सोमवारी उशिरा पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून जिल्ह्यामध्ये तीन अधिकारी नव्याने येणार आहेत.
काल दि.२२ रोजी सोमवारी काढण्यात आलेल्या बदल्यांच्या आदेशामुळे राज्यभरातील १०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत. यांना तातडीने रुजू होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे बदल्यांमध्ये जळगावचे डीवायएसपी संदीप गावित यांची पाचोरा विभागात बदली करण्यात आली आहे. राकेश जाधव यांची अमळनेर येथून जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे.
भुसावळ डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या जागी विक्रांत गायकवाड येणार आहेत. बदल्यांमुळे पोलीस दलामध्ये नवीन शिस्त व बदल आगामी काळात बघायला मिळणार आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी भास्कर डेरे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे तर भुसावळचे डॅशिंग डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेरच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बदली झाली आहे. याशिवाय मुक्ताईनगर येथे डीवायएसपी म्हणून राजकुमार शिंदे हे बदलून येत आहेत तर जळगावच्या संदीप गावित यांच्या जागी चंद्रपूर येथील डीवायएसपी सुशीलकुमार नायक येत आहेत.