यावल व खडका सूतगिरण्यांचा
जिल्हा बँके कडून होणार लिलाव
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील अनेक मोठ्या सहकारी संस्थांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून कर्ज घेतले असून ते थकीत आहे अशा संस्थांची मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव प्रक्रिया सुरू केली असून त्यात यावल येथील जे. टी. महाजन सूतगिरणी आणि भुसावळ तालुक्यातील खडका येथील महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचा समावेश आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून असे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे यात यावल येथील जे.टी. महाजन सूतगिरणी आणि सूतगिरणीच्या मालकीच्या जागेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सूतगिरणीवर ३१ मार्च २०२१ रोजी बँकेचे ४६ कोटी ५० लाख रूपये आणि नंतरचे व्याज बाकी आहे. सदर लिलावातून ही रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सूतगिरणीसाठी ८ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ ते ४ या कालावधीत ई-ऑक्शनच्या माध्यमातून लिलाव होणार आहे. यात संपूर्ण मशिनरीसह सूतगिरणी व पडीत जागेचा लिलाव होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच खडका येथील महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीवर जिल्हा बँकेचे ३१ मार्च २०२१ रोजी ७ कोटी १६ लाख रूपयांचे कर्ज आहे. यासाठी सूतगिरणीच्या मालकीच्या ६.८६ हेक्टर जागेचा लिलाव करण्यात येत आहे. हा लिलाव ७ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ ते ४ या कालावधीत ई-ऑक्शनच्या माध्यमातून होणार आहे.या लिलावाच्या निर्णयामुळे यावल आणि खडका येथील सूतगिरण्यांचे अस्थित्व मात्र इतिहासजमा होणार एव्हढे मात्र नक्की.
जिल्हा बँकेकडून जिल्ह्यातील यावल सूत गिरणी,खडका सूत गिरणी याचे सोबत फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना, कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना या सह अनेक मोठ्या सहकारी संस्थांनी कर्जे घेतली असून त्याचेही कर्ज थकीत असल्याने त्या संस्थाही जिल्हा बँकेने ताब्यात घेतल्या असून यांच्याही पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते.