पिकअपची पानटपरीला धडक : नैराश्यात पानटपरी मालकाची आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : मालवाहू पिकअपने पानटपरीला जोरदार धडक दिल्याने पानटपरी जमीनदोस्त झाल्याच्या नैराश्याने तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे पानटपरी मालकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात टपरीला धडक दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील बसस्थानकाजवळ पुनमचंद श्रावण बारी (वय-४०) हे लक्ष्मी पानटपरी चालवत त्यांच्या पानटपरीला १४ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजता एम.एच.२० ई.एल.७५८१ क्रमांकाच्या मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिली. यात पानटपरी जमीनदोस्त झाल्यामुळे पानटपरी मालक पुनमचंद बारी तणावात होते. पानटपरीची नुकसान भरपाई देतो असे मालवाहू पिकअप वाहन मालकाने पहिले सांगितले होते. नंतर दोन दिवसांनी मात्र पिकअप वाहन मालक नुकसान भरपाई देत नाही असे सांगितल्या नंतर पुनमचंद बारी यांना प्रचंड नैराश्य आले होते.
ज्या पानटपरीवर पुनमचंद बारी यांचा उदरनिर्वाह होता. ती पानटपरी आता जमीनदोस्त झाली व आपल्यावर असलेले कर्ज कसे चुकवावे या चिन्तेने बारी यांना नैराश्य आले होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचे पानटपरी हेच एकमेव साधन होते. या नैराश्यातच बारी यांनी सकाळी ७:३० वाजता राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोद करण्यात आली असून पानटपरीला धडक दिल्याप्रकारणी पिकअप वाहन मालकावर जळगाव एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.