ही नाथाभाऊंच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी प्रतिक्रिया– आ.महाजनांचा पलटवार
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : “नाथाभाऊं यांनी कोरोनावरून आज माझ्यावर दिलेली प्रतिक्रिया ही त्यांच्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविणारी आहे. मात्र मी त्या बद्दल बोलणार नाही, ते माझे संस्कार नाहीत. पक्षांतर केल्यानंतरही त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यांच्याकडे कुठलेही पद नसल्याकारणाने ते सध्या रिकामे आहे त्यामुळे त्यांना असे उपद्व्याप सुचत असून नाथाभाऊंचे आता डोके फिरले असून त्यांना ईश्वर सदबुध्दी देवोत” असे म्हणत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंचा गिरीश भाऊंना बुधवार पेठेतील पाठवायला पाहिजे या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी, ईडीकडून (सक्तवसुली संचनालय) अटक होणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप आमदार महाजन यांनी केला होता. तेव्हाच्या टीकेचे पलटवार आतापर्यंत चालू असून आज सकाळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मला ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची आवश्यक नाही पण गिरीश भाऊंना पुण्याच्या बुधवारपेठेत पाठवल पाहिजे असे आ.गिरीश महाजनांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना म्हटले होते यांवर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने होम क्वॉरंटाईन असलेले गिरीश महाजन यांनी जोरदार पलटवार करत खडसेवर हल्ला केला आहे. गिरीश महाजन म्हणाले, मला कोरोना झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी काल खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यानंतर त्यांनी आज विकृतीचा कळस गाठून अतिशय खालच्या स्तरावरून कॉमेंट केली आहे. खरं तर नाथाभाऊ यांचा स्वभाव आणि आजवरचा लौकीक पाहता ही प्रतिक्रिया तशी आश्चर्यकारक नाही. मात्र ही प्रतिक्रिया त्यांचे मानसिक संतुलन ढळल्याचे सिध्द करणारी ठरली आहे. मला या संदर्भामध्ये काहीही बोलायचं नाही. आता कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याची त्यांना हौस आलेली आहे.
मात्र हे त्यांचे फ्रस्टेशन आहे. सत्तेचा कोणता तरी तुकडा भेटेल म्हणून पक्षांतर केल्यानंतरही त्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यांच्याकडे कुठलेही पद नसल्याकारणाने ते सध्या रिकामे आहे त्यामुळे त्यांना असे उपद्व्याप सुचत आहे त्यांची ही भाषा निश्चितच शोभनीय नाही कुठलेही त्यांच्याकडे काम नसल्याकारणाने आता फक्त फुशारका मारण्याच्या पलीकडे ते काहीही करू शकले नाही. मी हे करेल, मी ते करेल अशा गमजा मारण्याशिवाय ते काही करणार नाही. या नैराश्यातूनच त्यांना आता चळ लागलेला आहे. मात्र हा चळ कितीही विकृत पातळीवर उतरला तरी आम्ही आमचे संस्कार सोडणार नाहीत. नाथाभाऊ लक्षात ठेवा. तुम्ही काय आहेत ? याची कुंडली आमच्याकडे देखील आहे. मात्र जी विकृती तुमच्याकडे आहे, ती आमच्याकडे नाही त्यामुळे असो, गेट वेल सुन नाथाभाऊ…..गेट वेल सून….या विकृतीतून लवकर बाहेर यावे यासाठी आपल्याला शुभेच्छा….! अशा शब्दांमध्ये आ. गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. जिल्ह्यातील या दोन्ही मातब्बर नेत्यांमधील शाब्दिक युद्ध फळ चांगलाच रंगल्याचे पाहायला मिळत आहे.