Raver। कोविड सेंटर मधील गायब महिला सापडली केळीच्या बागेत !
रावेर (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येत आहे यामुळे बऱ्याच ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसल्याचे ही मागील काळात पाहायला मिळाले होते. यात रावेर ग्रामीण रुग्णालय येथील ऑक्सिजन कोविड सेंटरमध्ये कोरोनाच्या उपचारार्थ दाखल झालेल्या वृद्ध महिला कोणालाही कसलीही माहिती न देता तेथून निघून गेल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली होती.
यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील तांदलवाडी येथील पद्माबाई कडू ठाकूर (वय 65) या रावेर शहरातील रेल्वे स्थानक रोड येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाल्या होत्या मात्र, अचानक शनिवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही महिला सेंटरमधून कुणालाही न कवळता निघून गेली. जेव्हा महिलेच्या नातेवाईकांनी सेंटरच्या कर्मचाऱ्यांना याची विचारणा केली असता यासंदर्भात त्यांना काहीही माहिती नसल्याने सेंटरचे कर्मचारी व रुग्णाचा नातेवाईक शाब्दिक चकमक उडाली. तेव्हा कोरोना पॉझिटिव्ह महिला सेंटर मधून निघून गेल्याचा प्रकार समोर आला. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला माहिती कळल्याने पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे त्यांनी यंत्रणा कामाला लावली व शहरासह परीसरात शोध सुरू केल्याने सदरील महिला रावेर रेल्वे स्थानक रोडवरील जुना पुनखेडा रोड येथील बौद्ध नगरीच्या पुढच्या बाजूस जुन्या स्मशानभूमी परिसरातील केळीच्या बागेत एका झाडाखाली बसलेली असल्याची दिसून आली. या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेऊन पुन्हा कोविड ऑक्सीजन सेंटर मध्ये दाखल केले.