रावेर येथील खून प्रकरणी चार जणांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर (प्रतिनिधी) : बऱ्हाणपूर रस्त्यावरील गोवर्धननगरमध्ये झालेल्या अनोळखी युवकाच्या खुनाच्या छळा लावत पोलिसांनी संशयित चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधिक्षक मुंडे यांनी सांगितले की, गुरूवारी सकाळी साडेदहा वाजेपूर्वी रावेर ते बऱ्हाणपूर रोडवरील पारस अग्रवाल यांच्या भूत बंगल्यामागील गोवर्धननगरच्या गेटजवळ एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले होते. याप्रकरणी तपास करतांना पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासून गुन्हा उघड केला आहे. त्यावरून संशयित आरोपी म्हणून महेश विश्वनाथ महाजन, योगेश उर्फ भैया रमेश धोबी, विकास गोपाळ महाजन आणि विनोद विठ्ठल सातव (सर्व रा. रावेर) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
टपरी फोडत असल्याचा संशयातून घडली घटना
चारही संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, विनोद सातव यांची आंबेडकर चौकातील असलेली पान टपरी एक अनोळखी युवक फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याने वरील चौघांनी त्यास मोटारसायकलवर बसवून गोवर्धननगर जवळ नेऊन त्याच्या नाकावर आणि तोंडावर मारहाण करून मोठ्या रुमालाचा वापर करून गळा आवळून त्याला जीवे ठार केल्याची कबुली दिली आहे.
रात्री ते चौघे दिसले अन् संशय बळावला
सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे रात्री आंबेडकर चौकातून बऱ्हाणपूर रस्त्याकडे गस्त घालत असताना त्यांना हेच चौघे संशयित रस्त्याने जात असल्याचे दिसून आले असता नाईक यांनी त्यांना हकलले व मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले होते. सकाळी खून झाल्याचे कळल्यावर या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चौघांनी खून केल्याची कबुली दिली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज वरून देखील या चौघांनी हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. खून झाल्याचे कळल्यानंतर ज्याचा खून झाला; तो अनोळखी असतांना देखील रावेर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ज्याचा खून झाला आहे. त्या युवकाची ओळख आणि चौघा संशयितांना देखील ताब्यात घेतले आहे. त्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना दहा हजार रुपयांचे आणि तपास करणाऱ्या पथकातील पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उप निरीक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, त्या अनोळखी मृताचे नाव शोधून काढले आहे. मृत युवकाचे नाव सौरभ गणेश राऊत (वय 22, रा. चिंतेश्वर गल्ली, गेवराई, जि. बीड) असल्याची माहिती मिळाली आहे.