धक्कादायक ; कर्जबाजारी तरुणाने युट्युबवरील व्हिडीओ बघून केली अफूची शेती
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। चोपडा तालुक्यातील वाळकी येथे तब्बल चार बिघे अफूची शेती करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी आज सकाळी धाडसी कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे कर्जबाजारी झाल्यामुळे युट्युबवरील व्हिडीओ बघून आरोपी तरुणाने अफूची शेती केली होती.
यासंदर्भात अधिक असे की, तालुक्यातील वाळकी येथे संशयित आरोपी प्रकाश सुदाम पाटील या तरुणाकडे 5 बिघे शेती आहे. परंतु सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्यानंतर त्याने वेगळ्या मार्गाने पैसा कमविण्याचे ठरविले. प्रकाशने युट्युब वरून अफूची शेती कशी करता येईल?, याचे धडे घेतले. यानंतर त्याने जवळपास चार बिघे या क्षेत्रात अफूची शेती केली. कुणाला संशय येऊ नये म्हणून आजूबाजूला मका पेरला. दरम्यान स्थानिक पातळीवरून गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरविले. आज सकाळी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी चोपडा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्यासोबत मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी धडक दिली. संबंधित तरुणाची विचारपूस केली असता त्याने आपल्यावर प्रचंड कर्ज होते आणि त्यामुळे खूप त्रास होत होता. म्हणून आपण अफूच्या शेतीचा मार्ग अवलंबिले त्याने प्राथमिक चौकशीत सांगितल्याचे कळते.
युट्युब बघून घेतले अफूच्या शेतीचे धडे
कर्जबाजारीपणामुळे आपल्याला वेगळ्या मार्गाने पैसा कमवा लागेल, हे प्रकारच्या लक्षात आल्यानंतर त्याने युट्युब बघून अफूची शेती कशी करता येईल? पीक आल्यानंतर कशा पद्धतीने खसखसच्या स्वरुपात तिची विक्री करता येईल,याचे पूर्ण धडे युट्युब वरून घेतले. पोलिसांनी प्रकाशच्या मोबाईल जप्त केल्यानंतर त्यात अफूच्या शेतीची संबंधित काही व्हिडिओ आढळून आले आहेत.
खसखस करून काही ठिकाणी विकली
प्राथमिक चौकशीत प्रकाशने साधारण दीड ते दोन किलो अफू खसखसच्या स्वरूपात अमळनेर चोपडासह परिसरात विकल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अवघ्या पंधरा दिवसानंतर अफूचे पीक निघणार होते
प्रकाशने साधारण डिसेंबर महिन्यात चार बिघे अफू पेरला होता. त्यामुळे अफूचे पीक आता पूर्णपणे तयार झाले होते. आणि पुढील पंधरा दिवसात त्या पिकाची कापणी करण्याचे प्रकाशचे नियोजन होते. परंतु तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयित आरोपीला पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे घटनास्थळी घेऊन गेले होते. तसेच दुसरीकडे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.