जळगाव जिल्ह्यातील ७५० शिक्षकांवर टांगती तलवार,मान्यतांची चौकशी सुरू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा।। नाशिक विभागामध्ये शिक्षकांच्या मान्यता व शालार्थ क्रमांक देताना झालेले गैरव्यवहार समोर आले होते. शिक्षक आ.किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत प्रश्न विचारल्यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनी शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांना बडतर्फ करणार असल्याचे जाहिर केले होते.या मान्यतांची ता चौकशी सुरू झाली असुन २०१५ ते २०१९ या काळात जिल्ह्यात ७५० शिक्षकांच्या मान्यता देण्यात आल्याने चौकशीसाठी उपसंचालकांची समिती दाखल झाली आहे.
नाशिक विभागात अनेक ठिकाणी बनावट प्रस्तावांवर शिक्षकांना मान्यता देण्यात आल्या शालार्थ आयडी देताना गैरव्यवहार झाले आहे. जळगाव जिल्ह्यात असेच प्रकार घडल्याने शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी ही बाब समोर आणली होती. विधानसभेत त्यांनी लक्षवेधी मांडली होती. एप्रिल महिन्यात समितीचे गठण करण्यात आले होते. मात्र ही समिती आली नव्हती. आता आ.किशोर दराडे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर व तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यावर ताशेरे ओढण्यात आल्याने त्यांच्या कार्यकाळातील वैयक्तीक मान्यतांची चौकशी करण्यासाठी औरगांबाद उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती दाखल झाली असुन माध्यमिक शिक्षण विभागात या समितीकडून फाईलींची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नाशिक उपसंचालकांचे पथकदेखील चौकशीसाठी आले आहे.
या पथकात औरंगाबादचे उपसंचालक अ. सं. साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बीडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक, शिक्षण विस्तार अधिकारी एन. जी. हजारे, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जालनाचे सुनिल, बिडचे कनिष्ठ सहाय्यक राजू राठोड यांचा समावेश आहे.समितीचे अध्यक्ष उद्या येणार असुन नाशिक येथील पथकाकडूनदेखील चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दोन पथक आले असल्याचे समजते. तपासणी करून अहवाल ८ तारखेला शासनाला सादर करावा असे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहे.