टँकर व दुचाकींचा अपघात : माय लेकाचा जागीच मृत्यू !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील महामार्गावर अपघातांची मालिका पुन्हा सुरु झाली असून बांभोरी गावाजवळच्या पुलावर टँकरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. अपघातात एक जण जखमी झाली आहे.
एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील रहिवाशी असलेल्या चारुशीला राहुल पाटील या मुलगा निशांत पाटील हे चारुशीला पाटील यांच्या बहीण रुपाली पाटील हे तिघे दुचाकी क्रमांक एमएच.१९.डी.क्यू.३८९६ ने एरंडोलहून जळगावला आई – वडिलांकडे येत होते. बांभोरी गावाजवळ एका पुलावर महामार्गावरून जात असलेल्या टँकरला ओव्हरटेक करताना तोल जाऊन ते पडले.
अपघातात टँकरच्या मागील चाकाखाली सापडल्याने चारुशीला पाटील (वय ४०) व निशांत पाटील ( वय १२) हे जागीच ठार झाले. दुचाकी चालविणाऱ्या रुपाली पाटील या अपघातात जखमी झाल्याने नागरिकांच्या मदतीने त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. निशांत पाटील हा एकुलता एक मुलगा होता.
रुपाली पाटील या एरंडोल येथी शिक्षिका म्हणून नोकरी करीत होत्या तर जळगावातील मुक्ताईनगर येथे आई-वडिलांकडे राहत होत्या. आज बहीण व तीच्या मुलाला घेऊन येत असतांना हा अपघात घडला. अपघातात असलेले गँस टँकर जळगाव तालुका पोलीस स्थानकात जमा करण्यात आले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देखील आहुजा नगरजवळ एका टँकरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी झाले होते.