TET Exam Scam ; त्या फाईली गहाळ झाल्या की गायब केल्या, नेमक्या गेल्या कुठे?जि.प.च्या शिक्षण संबंधित विभागात त्या फाईली शोध घेऊनही सापडेनात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून २०१५ ते २०१९ या कालावधीत देण्यात आलेल्या ७५० वैयक्तिक मान्यतेप्रकरणी दोन दिवसांत ७५० फायलींपैकी ३७२ फायली सापडल्या आहेत. दरम्यान, उर्वरित फायली सापडत नसल्यामुळे ‘त्या’ फायली गहाळ झाल्या की गायब केल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, फायली न सापडल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महेश पालकर यांनी दिल्या आहेत.
फायली गेल्या कुठे?
तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून २०१५ ते २०१९ या कालावधीत देण्यात आलेल्या ७५० वैयक्तिक मान्यतेप्रकरणी दोन दिवसांपासून पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांचे पथक जिल्हा परिषदेत चौकशी करीत आहे. या दोन दिवसांत या पथकाला वैयक्तिक मान्यतेच्या ७५० फायलींपैकी ३७२ फायली सापडल्या आहेत. मात्र, उर्वरित फायली अद्याप सापडलेल्या नाहीत. त्यामुळे या फायली गेल्या कुठे, असा प्रश्न चौकशी पथकाद्वारे उपस्थित करण्यात येत आहे. मात्र उर्वरित फायली न सापडल्यास याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महेश पालकर यांनी दिल्या आहेत.
दोन दिवसांपासून पथक जळगावात
नाशिक विभागामध्ये शिक्षकांच्या मान्यता देताना झालेले गैरव्यवहार समोर आल्यानंतर याप्रकरणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधान परिषदेत आवाज उठविला होता. त्यावेळी शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांना बडतर्फ करणार असल्याचे जाहीर केले होते. याप्रकरणी आता चौकशी सुरू झाली असून, महाजन यांच्या २०१५ ते २०१९ या काळात जिल्ह्यात ७५० शिक्षकांच्या मान्यता देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची गेल्या आठवड्यात औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक यांच्या पथकाने जळगावात येऊन चौकशी केल्यानंतर आता पुण्याहून शिक्षक संचालक महेश पालकर व त्यांचे पथक दोन दिवसांपासून जळगावात आले आहेत. दोन दिवसांत या पथकाला ७५० पैकी ३७२ फायली सापडल्या आहेत.
आतापर्यंत ३७२ फाईल सापडल्या : महेश पालकर
गेल्या दोन दिवसापासून शिक्षक मान्यताची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत ३७२ फाईल सापडल्या आहेत. उर्वरित फाईल सापडलेल्या नाहीत. या फाईल मिळणेबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. जर फाईल सापडत नसतील तर त्या गहाळ झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याबाबतही पत्रात नमुद केले आहे, असे पुणे माध्यामिक व उच्च माध्यामिक शिक्षण विभाग संचालक महेश पालकर यांनी माध्यमांना सांगितले.
नेमक्या फाईल गेल्या कुठे?
जळगाव जिल्ह्यात २०१५ ते २०१९ या काळात ७५० शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने, महेश पालकर व त्यांचे पथक जिल्हा परिषदेच्या अभिलेखा विभागात या फायलींचा शोध घेत आहे. ज्या फायली सापडल्या. त्यात मान्यता कशा देण्यात आल्या आहेत. नियमानुसार देण्यात आली आहे की नाही, याची पडताळणी करीत आहेत. मात्र, ७५० पैकी ३७२ फायली सापडल्या आहेत. या फायलीचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण संबंधित इतर विभागात शोध घेऊनही सापडलेल्या नाहीत. त्यामुळे ‘त्या’ फायली गहाळ झाल्या की गायब केल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.