निंदकाला धन्यवाद द्यावेत- हभप बाळकृष्ण महाराज
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : आपण सर्व एकच आहोत म्हणून प्रेमाचा अभाव नको, सर्वांमध्ये एकच आत्मा विराजमान असल्याने सर्वांकडे आत्मभावाने बघा असे प्रसिध्द किर्तनकार हभप बाळकृष्ण महाराज (दादा) वसंतगडकर यांनी श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहाच्या किर्तन सोहळ्यात सांगितले.
कोथळी येथे सुरू असलेल्या सनातन सतपंथ संप्रदाय द्वारा आयोजित श्रीमद् भागवत कथा व नाम संकीर्तन सप्ताहासाठी शेकडो नागरिकांची उपस्थिती धर्म मंडपात होती. या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा करताना बाळकृष्ण महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून श्रोत्यांचे मन जिंकून घेतले. त्यांनी सांगितले की मनुष्याचे शरीर वेगळे असले तरी आपल्यातील आत्मा एकच आहे. सौंदर्य, ज्ञान, प्रतिष्ठा, सत्ता टिकवण्यासाठी तपश्चर्या आवश्यक असून संतांच्या चरणस्पर्शाने परमेश्वराची प्रसन्नता होते. आपली निंदा करणाऱ्यांना धन्यवाद द्यावेत कारण त्यामुळे आपल्यातील दोष काय आहे ते आपणास कळते असा मौलिक उपदेश त्यांनी दिला.
आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त सनातन सतपंथ संप्रदायाने आयोजित केलेला वारकरी संप्रदायासाठी हा कार्यक्रम हे अनेकांना कोडे आहे. याचे स्पष्टीकरण देताना सर्व संप्रदायांची उपासना पद्धती वेगळी असली तरी सर्वांचे ध्येय एक आहे. संप्रदाय समाज वेगळे असले तरी आधी आम्ही भारतीय आहोत. त्यासाठी समस्त संप्रदायांनी एकत्रित येणे हाच खरा परमार्थ असल्याचे या कथेचे आयोजक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.
श्रीमद् भागवत कथेचे निरुपण करताना आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी सांगितले की, दयाभाव हाच खरा धर्म व सदाचार ही आपली श्रीमंती आहे. आपल्या आचरणाचा सुगंध सर्वत्र पसरला पाहिजे. ग्रहस्थांचे, संतांचे, यतींचे आचरण कसे असावे याचे मार्गदर्शन श्रीमद्भागवत ग्रंथात केलेले असून तसे आचरण आपण अंगीकारावे असे सांगितले. त्यांनी भागवतातील गजेंद्र मोक्षाची कथा वर्णन करून परमेश्वराचा श्रद्धेने धावा केल्यास तो अन्यान्य स्वरूप धारण करून भक्तांचा उद्धार करीत असतो. आदिशक्ती मुक्ताई यांच्या दरबारात या कार्यक्रमाचा रसपान घेण्यासाठी सभामंडपात संत महंतासह, टाळकरी, वारकरी, लोक प्रतिनिधी, धर्मप्रेमी भाविकांची अलोट गर्दी दिसून आली.