प्राणघातक हल्ल्यांतील ” त्या ” गंभीर जखमी तरुणाचा अखेर मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरात प्राणघातक हल्ल्यांचे सत्र थांबता थांबत नाही. काल शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास २५ वर्षीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणावर त्याच्या ओळखीच्या दोन इसमांनी त्याच्यावर कीरकोळ कारणावरून चाकूचे पाच ते सहा वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आले होते. आज सकाळी ९ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, या मुळे शहरात खळबळ उडाली असून शहरात प्राणघातक हल्ल्यांचे सत्र थांबत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल असलेल्या पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे (वय २५) रा. आदित्य चौक, मेहरुण असे मयत तरुणाचे नाव असून एकदा तो हद्दपारही झाला होता. शनिवारी रात्री सागर खंडारे आणि विशाल सपकाळे यांनी पवनवर कीरकोळ कारणावरून हल्ला केल्याची माहिती मिळाली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री कलम ३०७ प्रमाणे नोंद करण्यात आली होती. आता खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.