तृतीय पंथीयाचा ग्रामपंचायत निवडणूक अर्ज औरंगाबाद खंडपीठाकडून वैध.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक मधील होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एका तृतीयपंथी उमेदवाराला स्त्री राखीव या वर्गवारीतून उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक लढविण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
अंजली गुरू संजना जान या तृतीयपंथीने महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून जलगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधिताची स्त्री प्रवर्गासाठी राखीव वॉर्डातून निवडणूक लढवण्याची मागणी फेटाळली होती. यावरून तहसील कार्यालयात बराच काळ वाद देखील झाला होता.त्या मुळे अंजली गुरू संजना जान यांचा अर्ज निवडणूक अधिकार्यांनी फेटाळून लावल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यांच्यातर्फे अॅड.आनंद भंडारी यांनी युक्तीवाद सादर केला. यात तृतीयपंथी व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा २०१९ नुसार लिंग निवडण्याचा अधिकार तृतीयपंथी व्यक्तीस आहे. याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. या अनुषंगाने खंडपीठाचे न्या.रवींद्र घुगे यांनी अंजली गुरू यांचा निवडणूक अर्ज स्त्री प्रवर्गातून मान्य केला. मात्र, त्यांना भविष्यात पुरुष म्हणून सवलत घेता येणार नसल्याचेही स्पष्ट केले. यामुळे अंजली गुरू संजना जान यांना आता महिला राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविता येणार असल्याने लढत रंगतदार होणार आहे.