आता पर्यंत जळगाव जिल्ह्यातील १२ लाख १३ हजार लाभार्थ्यांना कोरोना लसीचे दिले डोस
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। कोरोनापासून बचावासाठी कोरोना प्रतिबंधक लस महत्वपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच नागरीकांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ९६ हजार ९३८ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर ३ लाख १५ हजार ९१६ लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण १२ लाख १२ हजार ८५४ लाभार्थ्यांना कोरोना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्यातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी, २०२१ रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर ५ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४५ वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. तर १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर १ मे ते ११ मेपर्यंत जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचेही लसीकरण करण्यात आले. त्यानंतर २१ जूनपासून जिल्ह्यातील १८ वर्षापुढील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.
कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात येत आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ९६ हजार ९३८ लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर ३ लाख १५ हजार ९१६ लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण १२ लाख १२ हजार ८५४ लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील ५ लाख ८६ हजार २१० तर ग्रामीण भागातील ६ लाख २६ हजार ६४४ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय झालेले लसीकरण आकडेवारी
जळगाव-३०५१४८, भुसावळ-१५४९७८, अमळनेर-७५४०१, चोपडा-७७१३८, पाचोरा-६४२५३, भडगाव-४०१९८, धरणगाव-३९८६९, यावल-६७९६०, एरंडोल-३५८१४, जामनेर-७६६२१, रावेर-८२३२५, पारोळा-४०६२६, चाळीसगाव-९३७८१, मुक्ताईनगर-३६७७७, बोदवड-२१९६५ याप्रमाणे लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.