जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोतर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यावर्षी नाशिक परिक्षेत्र, अँन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधिक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ ऑक्टोबर ते दि. १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत जळगाव अँन्टी करप्शन ब्युरोतर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर राज्यपाल यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचन करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पध्दतीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरीकाने आपले शासकीय काम करून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. परंतु काही वेळेस सर्वसामान्य नागरीकांना असे वाटते की, शासकीय कार्यालयातील काम फक्त लाच दिल्यावरच कार्यान्वित होते. या धारणेला बदलण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरीक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्यास मदत करु शकतात. त्या अनुषंगाने “दक्षता जनजागृती सप्ताह” अंतर्गत अँन्टी करप्शन ब्युरोची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या निमीत्ताने जळगाव जिल्ह्यातील शासकीय कार्यालये/ शाळा/ महाविदयालये/ ग्रामीण भागात भ्रष्टाचाराच्या दृष्टपरिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे आयोजन करण्यात येणार आहे.